
प्रतिनिधी – सोलापूर
महापूर आणि दुष्काळाच्या दुहेरी संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा गावांतील शेतकऱ्यांना आता महावितरणच्या सक्तीच्या लोडशेडिंगचा फटका बसत आहे. अनियमित वीजपुरवठ्यामुळे पिके धोक्यात आली असून, शेतीसाठी दिवसा किमान आठ तास अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड, चंद्रहाळ, हत्तूर, राजूर, बिरनाळ आणि होणमुर्गी येथील शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हा अधीक्षक विद्युत अभियंता सुनील माने यांना सामूहिक निवेदन दिले.निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी शंभर वर्षांतील मोठ्या महापुरामुळे शेतजमिनी, पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर यंदा पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. अशा परिस्थितीत आता रब्बी ज्वारी हेच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमुख साधन उरले आहे.
सध्या नदीत पाणी उपलब्ध असतानाही महावितरणच्या सक्तीच्या लोडशेडिंगमुळे आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. दिवसा वीजपुरवठा खंडित असतो, तर रात्री अनिश्चित वेळेत वीज येत असल्याने शेतीचे नियोजन कोलमडले आहे. वारंवार वीज ये-जा होत असल्याने कृषिपंप जळण्याचे प्रकार घडत असून, पिके पाण्याअभावी करपत आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आणि नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्थाही या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यातील अनियमितता केवळ शेतीपुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सहा गावांतील सक्तीचे लोडशेडिंग तातडीने रद्द करून दिवसा किमान आठ तास अखंड वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्याकडे केली आहे. आता महावितरण प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते, याकडे संबंधित गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















