
प्रतिनिधी – सोलापूर
खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाने बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे व पानगाव येथे प्रत्यक्ष शेतपाहणी केली. पावसाअभावी जळून गेलेली सोयाबीनची पिके, तूर पिकांची स्थिती आणि पूर्णपणे कोरडा पडलेला पानगाव येथील साठवण तलाव पाहून पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची व्यथा मांडत आर्थिक मदत आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढविण्याची मागणी केली.

बार्शी तालुक्यात सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट; १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा, दोन ते तीन दिवसांत पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण होणार


केंद्रीय पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या पीक विभागाचे संचालक डॉ. के. पोन्नुसामी करीत आहेत. पथकामध्ये पेयजल व स्वच्छता विभागाचे टीम लीडर अबसार अहमद खान आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहाय्यक संचालक सुमित शर्मा यांचा समावेश आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे हेदेखील पथकासोबत उपस्थित होते.


पावसाअभावी सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट
पानगाव येथे पथकाने शेतकरी आनंद धनंजय मोरे यांच्या शेतातील जळून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी पथकाने त्यांच्याकडून शेतीसाठी झालेला खर्च, पिकांची सद्यस्थिती आणि अपेक्षित उत्पन्न याची माहिती घेतली. पाऊस चांगला झाला असता, तर सोयाबीनमधून हेक्टरी ५० ते ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असते; मात्र पावसाअभावी संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. जळालेले सोयाबीन जनावरेही खात नसल्याने दुहेरी संकट ओढवले असल्याचे मोरे यांनी सांगितले.
पथकाने पानगाव येथील साठवण तलावाचीही पाहणी केली. तलाव पूर्णपणे कोरडा पडल्याचे दिसून आले. यावरून बार्शी तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती स्पष्ट होत असल्याची माहिती प्रशासनाने पथकाला दिली.
चार एकरांतील पिकावर खर्च; उत्पन्नाची आशा मावळली
उपळाई ठोंगे येथे श्रीमती लता शेळवणे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यांचे बंधू कल्याण चव्हाण यांनी पथकाला पीक नुकसानीची माहिती दिली. चार एकर क्षेत्रात सोयाबीनचे पीक घेण्यासाठी प्रति एकर २० ते २५ हजार रुपये खर्च झाला असून, पीक पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पथकाने पेरणीपासून झालेला पाऊस, पावसातील खंड, पिकांची वाढ, गावातील एकूण पेरणी क्षेत्र, सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र, आंतरपीक पद्धती आणि भूजल पातळी याबाबत सविस्तर माहिती घेतली. जनावरांसाठी चारा उपलब्धतेची स्थिती जाणून घेत चारा डेपो सुरू करणे किंवा चारा छावण्या उभारणे यापैकी कोणता पर्याय अधिक उपयुक्त ठरेल, याबाबतही शेतकऱ्यांची मते विचारात घेण्यात आली. पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बार्शी तालुक्यात सरासरीपेक्षा ४४.८३ टक्के कमी पाऊस
प्रशासनाने केंद्रीय पथकासमोर सादर केलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यात १३८ गावे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ५० हजार ३१६ हेक्टर आहे. यंदा सरासरी खरीप पेरणी क्षेत्र ७३ हजार १७७ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख १ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन, तूर आणि उडीद ही तालुक्यातील प्रमुख खरीप पिके असून द्राक्षे व कागदी लिंबू ही प्रमुख फळपिके आहेत.
तालुक्यात सरासरी ५२८.१० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २९१.३४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसात ४४.८३ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. तसेच २१ ते ४४ दिवसांचा कोरडा कालावधी राहिल्याने पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. तालुक्यातील सर्व १३८ गावे आणि १ लाख १२ हजार २२६ हेक्टर क्षेत्र दुष्काळबाधित झाले असून, ७३ हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच ६५.४२ टक्के क्षेत्रावरील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करणार
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केंद्रीय पथकाला सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसानीची व्याप्ती आणि पाणीटंचाईबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, सध्या १०८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पीक नुकसानीचे आतापर्यंत ६० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, पुढील दोन ते तीन दिवसांत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, तहसीलदार एफ. आर. शेख, मृद व जलसंधारण विभागाचे रामचंद्र क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी संतोष कोल्हे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
उद्या आणखी तीन तालुक्यांत पाहणी
केंद्रीय पथक उद्या उत्तर सोलापूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. प्रत्यक्ष निरीक्षणे, शेतकऱ्यांशी झालेला संवाद आणि संबंधित विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पथक केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. या पाहणीनंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















