
प्रतिनिधी – सोलापूर
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील विविध पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. पत्रकारांवरील हल्ल्यांना आळा घालून संबंधित दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि क्राइम पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल भांगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
पत्रकार हा समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम करतो. अशा पत्रकारांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी पत्रकार संघटनांनी मांडली.
पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. निखिल सुक्रे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. कारवाई न झाल्यास पुण्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.तसेच महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून, राज्यातील पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे पत्रकार संघटनांनी स्पष्ट केले.
यावेळीश्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम(बापू)खेलबुडे,मनीष केत, किरण बनसोडे यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार,छायाचित्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्व पत्रकार संघटनांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















