
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची सूचना; टंचाई निवारण, जलसंधारण व घरकुल योजनांचाही घेतला आढावा.
प्रतिनिधी – सांगोला
पंचायत समिती सांगोला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 (सन २०२६-२७) आणि तालुक्यातील पाणीटंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते.

या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगोला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात १०० टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अभियानातील आठही घटकांनुसार प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच लोकप्रतिनिधींनी आपल्या गणातील किंवा गटातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी विविध शासकीय योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मागील वर्षी सांगोला तालुक्याने अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली होती. यामध्ये चिनके ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. अद्याप घरकुल बांधकाम सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना नोटीस बजावून विहित कार्यवाही करावी, तसेच नियमानुसार बांधकाम सुरू न झालेली घरकुले रद्द करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना कुशल जैन यांनी दिल्या.

यावेळी नूतनीकरण करण्यात आलेल्या गटविकास अधिकारी यांच्या कक्षाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कक्षाची पाहणी करण्यात आली.बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भोपळे रोड, सांगोला येथील शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मेडशिंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. तसेच बुरलेवाडी येथील टँकर भरणा पॉईंटची पाहणी करून टँकरद्वारे होणारे पाणी वितरण व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, दादासाहेब लवटे, केराप्पा पांढरे, योगेश खटकाळे, पंचायत समिती उपसभापती अजय सरगर, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब बंडगर, बापू जावीर, डॉ. सुदर्शन इंगवले, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता नितीन करवते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश खांडेकर, विस्तार अधिकारी (पंचायत) अमोल तोडकरी, आत्माराम कोळी, बाबासाहेब खटकाळे, पुंडलिक गंगदे, अजित देशमुख, महेश जाधव आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 च्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासोबतच जलसंधारण, पाणीपुरवठा आणि टंचाई निवारणाच्या कामांना गती देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















