
प्रतिनिधी – सोलापूर
समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांनाच आज स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना स्वतःचे पक्के घर नसून त्यांना भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. पत्रकारांच्या या घरकुलाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी टोपी व काळी फीत परिधान करून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या उदासीनतेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेले एक सामाजिक दायित्व आहे. अल्प मानधन आणि तुटपुंज्या जाहिरातींच्या उत्पन्नावर काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना आर्थिक परिस्थितीमुळे स्वतःच्या मालकीचे घर घेणे शक्य झालेले नाही. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून पत्रकारांनी शासनाचे आदेश, सूचना आणि महत्त्वाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य बजावले. मात्र, अशा पत्रकारांच्या निवाऱ्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याची खंत समितीने व्यक्त केली.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील स्वतःच्या मालकीचे घर नसलेल्या पत्रकारांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने १८ जून २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे विभागीय आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन घरकुल योजनेबाबत निवेदन सादर करण्यात आले होते.
या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्त, पुणे यांनी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या संचालकांना पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप या प्रकरणी अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याने पत्रकार सुरक्षा समितीने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
पत्रकारांना हक्काचा निवारा मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार – यशवंत पवार
दिवाळीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा होत असताना समाजाला दिशा देणाऱ्या आणि वंचित, पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना मात्र स्वतःच्या हक्काच्या घरासाठी काळी टोपी आणि काळी फीत लावून रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही बाब दुर्दैवी असल्याचे मत पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त केले.
सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार नेहमीच प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित करतात. मात्र, आज त्यांच्याच मूलभूत निवाऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने पत्रकारांच्या घरकुलाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा. पत्रकारांना त्यांच्या हक्काचे घर मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा ठाम इशाराही प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला.
आंदोलनात पत्रकारांचा मोठा सहभाग
या आंदोलनात पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. राम हुंडारे, जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे, सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी, कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, उपाध्यक्ष रमेश दग्गारी, सचिव गणेश निंबाळकर, दैनिक अबतकचे प्रसाद जगताप, दत्तात्रय बनसोडे, विक्रम आठवले, श्रीनिवास पेद्दी, सुधीर डोळे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















