
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातील तब्बल ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या यादीतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या कर्मचाऱ्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस मिळावा, यासाठी महापौर विनायक रामकृष्ण कोंड्याल यांनी पुढाकार घेतला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याने वंचित कर्मचाऱ्यांच्या बोनस मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले. परिवहन विभागातील ६० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याची बाब त्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आपल्यालाही बोनसचा लाभ मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेत महापौर कोंड्याल यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आणि मुख्यालय अधिकारी रत्नराज जवळगीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच बोनसपासून वंचित राहिलेल्या ६० कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सणासुदीच्या काळात कोणताही कर्मचारी बोनसच्या लाभापासून वंचित राहू नये, सर्व कर्मचाऱ्यांना समान न्याय मिळावा, अशी भूमिका महापौरांनी यावेळी मांडली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रत्यक्ष बोनस मिळण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी कामगार नेते अशोक जानराव, एम. एम. तांबोळी, लखन बंडगर, तानाजी मल्लव, सुरेश नवगिरे, मुकेश गायकवाड, रेवण स्वामी, विनोद सरवदे, भारत शिरसागर, सादिक खैरादी आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्याबद्दल उपस्थित कर्मचाऱ्यांनी महापौरांचे आभार मानले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















