
प्रतिनिधी – सोलापूर
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील बोगस जातीचे दाखले तपासून ते रद्द करण्यात यावेत, तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या ६५-निरावागज जिल्हा परिषद गटातील रोहित राजू भोसले विरुद्ध शिवानी बाळासाहेब हिरवे यांच्या जात पडताळणी प्रकरणाच्या सुनावणीस होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ रमाबाई फाउंडेशन फॉर जस्टिसच्या वतीने सोलापुरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील पूनम गेट (मोर्चा गेट), सोलापूर येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी मंडप, संघटनेचे बॅनर आणि ध्वनिक्षेपकासह आवश्यक परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे –
१. शिवानी बाळासाहेब हिरवे तथा शिवानी अभिजीत देवकाते यांच्या जात पडताळणीचा अर्ज अवैध घोषित करण्यात यावा.
२. शिवानी अभिजीत देवकाते यांचे पुणे जिल्हा परिषदेच्या ६५-निरावागज जिल्हा परिषद गटाचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
३. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारे उमेदवार ॲड. रोहित राजू भोसले यांना विजयी घोषित करण्यात यावे.
४. शिवानी अभिजीत देवकाते यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून जातीचा दाखला मिळविल्याचा आरोप असून, संबंधित दाखला रद्द करण्यात यावा.
५. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.
६. कथित बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
७. योग्य कागदपत्रांची पडताळणी न करता अनुसूचित जातीचा दाखला दिल्याचा आरोप करीत उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्रमांक २, सुमित सुभाषराव शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
८. प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जातीच्या दाखल्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करीत जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
९. भविष्यात अशा प्रकारचे कथित बनावट जातीचे दाखले तयार करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी करण्यात याव्यात.
या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रमाबाई फाउंडेशन फॉर जस्टिसच्या वतीने करण्यात येत आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















