
औज मंद्रूप येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प!
प्रतिनिधी -:औज मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर)
शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या सामाजिक उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशन’चा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी तक्षशिला विहार, नालंदा नगर, औज मंद्रूप येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचे महाराष्ट्र समन्वयक यशवंत फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मल्लिकार्जुन करके होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धाराम गायकवाड, उपाध्यक्ष अक्षदा गायकवाड व सचिन शिवशरण हे संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे कामकाज पाहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ताहेरताज पाटील, अहमद जहागिरदार, इमरान जहागिरदार, इरफान जहागिरदार, माजी पोलीस पाटील पुंडलिक गायकवाड, अंकुश गायकवाड, भाऊसाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.संस्थापक अध्यक्ष सिद्धाराम गायकवाड यांनी संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जुलै २०२६ मध्ये संस्थेची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये शासकीय विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काम करताना मिळालेला अनुभव आता आपल्या गावाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोगात आणण्याचा संकल्प आहे.
संस्थेच्या माध्यमातून गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि शासकीय योजनांबाबत जनजागृती, ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, गावातील समस्या शासकीय योजनांशी जोडून सोडविणे, तसेच महिलांचे सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मान्यवरांनी व्यक्त केल्या अपेक्षा
यावेळी यशवंत फडतरे म्हणाले की, ग्रामपंचायत बळकट झाली तरच गावाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो. संस्थेच्या माध्यमातून गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल. तसेच महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.अहमद जहागिरदार यांनी सिद्धाराम गायकवाड यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करताना सांगितले की, या संस्थेमुळे गावातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
सरपंच मल्लिकार्जुन करके यांनी अशा सामाजिक संस्थेची स्थापना ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून ग्रामस्थांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ताहेरताज पाटील यांनी संस्थेच्या भविष्यातील सामाजिक कार्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन शिवशरण, विठ्ठल गायकवाड, उमेश कांबळे, प्रथमेश गायकवाड, महासिद्ध वाघमारे आणि दयानंद गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विठ्ठल गायकवाड यांनी केले.
लर्न अँड लीड वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला असून, औज मंद्रूपच्या सामाजिक विकासाच्या वाटचालीत या संस्थेच्या स्थापनेमुळे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















