
प्रतिनिधी – सोलापूर
डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथील प्रशिक्षणार्थी आलिशा शेख हिने अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२६ मध्ये तब्बल ९६ टक्के गुण मिळवून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने देशातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी एकाच दिवशी कौशल्य दीक्षांत समारंभ आयोजित केला जातो. विविध व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींच्या यशाचा गौरव करण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात येते. यावेळी प्रत्येक व्यवसायातील प्रथमतीन क्रमांकाच्या प्रशिक्षणार्थींचा सन्मान करण्यात येतो, तर इतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते.
डफरीन चौक येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), सोलापूर येथे टेक्स्टाईल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन या दोन वर्षांच्या अभियांत्रिकी व्यवसायात प्रशिक्षण घेतलेल्या आलिशा शेख हिने ९६ टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या यशामागे शिल्पनिदेशक श्री. अंबादास लोला यांचे मार्गदर्शन लाभले.
आज संस्थेत आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभात आयएमसीचे अध्यक्ष श्री. प्रफुलकुमार वेद आणि प्राचार्या कु. इंदिरा रणभिडकर यांच्या हस्ते आलिशा शेख हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेतील विविध व्यवसायांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत प्रशिक्षणार्थींचाही गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र वितरण आणि गुणवंतांचा सत्कार यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास गटनिदेशक श्री. एम. ए. पाटील, गटनिदेशक श्रीमती आर. जे. शिकलगार, शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक चंदालिया यांनी केले.
समारंभ यशस्वी करण्यासाठी श्री. टी. बी. तांबे, श्री. पी. एस. सुतार, श्री. एस. बी. कोळेकर, श्रीमती एस. एम. भीमनवरू, कुमारी पी. व्ही. दराडे, श्री. ए. के. तांबोली, श्री. ए. एस. दिलपाक, श्री. ए. ए. सय्यद तसेच सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद आणि प्रशिक्षणार्थींनी विशेष परिश्रम घेतले.
आलिशा शेख हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, तिची कामगिरी इतर विद्यार्थिनी व प्रशिक्षणार्थींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















