
प्रतिनिधी – सोलापूर
सह्याद्री फाउंडेशनतर्फे रक्षाबंधनानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ या उपक्रमाला सोलापूर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांसाठी पाठविण्यात आल्या.सह्याद्री फाउंडेशनकडून गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षी शाळा आणि विद्यार्थिनींचा वाढता सहभाग या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे. यंदाही विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने राख्या तयार करून सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमात जि.प. मुलींची शाळा कुंभारी, जि.प. शाळा बोरामणी, वडजी, गंगेवाडी, संगदरी, उळेवाडी, ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगाव, जि.प. प्राथमिक शाळा इंदिरानगर कासेगाव, कासेगाव, वरळेगाव, बक्षी हिप्परगे, उळे, शारदा निकेतन विद्यालय, स्प्रिंगफील्ड प्री-स्कूल उळे आणि ग्लोबल इंग्लिश स्कूल बोरामणी येथील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. संकलित केलेल्या सर्व राख्या १५व्या बटालियन ‘द मराठा लाईट इन्फंट्री’ तुकडीकडे सुपूर्द करण्यात आल्या. बटालियनमार्फत या राख्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्राने सन्मानित नायब सुभेदार विजय कुमार यादव आणि जवान निलेश लोंढे यांच्याकडे सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या सुपूर्द करण्यात आल्या.जिल्हा परिषद सदस्य तथा सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून आम्ही सातत्याने ‘एक राखी सैनिक बांधवांसाठी’ हा उपक्रम राबवत आहोत. दरवर्षी विद्यार्थी आणि शाळांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो. आपले सैनिक कुटुंबापासून दूर राहून सीमेवर अहोरात्र देशाचे रक्षण करतात. विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी ही केवळ राखी नसून सैनिक बांधवांप्रती असलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, देशसेवा आणि सैनिकांप्रती आदराची भावना रुजावी, हाच सह्याद्री फाउंडेशनचा उद्देश आहे.”
याप्रसंगी एपीआय उमेश रोकडे, यशवंत खंडागळे, सह्याद्री फाउंडेशनच्या सचिव प्रतिभा खंडागळे, मंजुश्री रोकडे, सुजाता गोरे, सायली उरीट आदी उपस्थित होते.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिक बांधवांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचा सण सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाच्या भावनेने साजरा केला.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838249
















