
प्रतिनिधी – सोलापूर,
स्वातंत्र्यपूर्व काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात सोलापूरच्या भूमिपुत्रांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून ऐतिहासिक लढा उभारला. या क्रांतिकारी परंपरेची पार्श्वभूमी असलेल्या सोलापूरच्या भूमीतून आता श्रमिक-कष्टकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. हा लॉंग मार्च ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करून मेहनत घ्यावी आणि श्रमिकांचा हा लढा यशस्वी करावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी लढाऊ कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कॉ. आडम मास्तर बोलत होते.
कॉ. आडम मास्तर पुढे म्हणाले की, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्व महापुरुषांना अभिवादन करून पुणे नाका येथून मुंबई मंत्रालयाकडे लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे. या लॉंग मार्चमध्ये सहभागी श्रमिक-कष्टकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा, दररोज चहा, नाश्ता, जेवण तसेच मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था केली जाणार असून, त्यासाठी पक्षाचे सुमारे १,००० स्वयंसेवक व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.लॉंग मार्चसाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून संकलित करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी ओळखून हे काम तडीस नेण्याचा निर्धार करावा, असे आवाहनही कॉ. आडम मास्तर यांनी केले.
मेळाव्यात किशोर मेहता, विल्यम ससाणे, बापू साबळे, हसन शेख, प्रदीप मरेड्डी यांच्यासह अन्य लढाऊ कार्यकर्त्यांनी लॉंग मार्चच्या यशस्वी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. समाजमाध्यमांद्वारे प्रसार-प्रचार, आंदोलकांची नोंदणी, प्रशासकीय व्यवस्था तसेच लॉंग मार्चच्या नियोजनाबाबत विविध सूचना करण्यात आल्या.
लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने श्रमिक-कष्टकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी विडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, घरोघरी व वस्तीपातळीवर गटचर्चा, कॉर्नर सभा, रिक्षा प्रचार आणि पत्रकवाटप यांसारख्या माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी कॉ. एम. एच. शेख आणि कॉ. नसीमा शेख यांनी मेळाव्याला संबोधित केले. पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर ॲड. अनिल वासम आणि कॉ. शेवंताताई देशमुख उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















