
प्रतिनिधी – सोलापूर
श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा, सोलापूर संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर, प्राथमिक शाळा, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे प.पू. पट्टाचार्य १०८ विशुद्धसागरजी महाराज यांचे शिष्य तथा ‘सोलापूर नगर गौरव’ प.पू. १०८ मुनिश्री सुप्रभसागर महाराज यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उद्बोधन झाले.
यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा, मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सचिन मेहता, बालक मंदिर विभागप्रमुख विभावरी रणदिवे तसेच निवृत्त पर्यवेक्षक अरुण धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विद्यार्थ्यांनी णमोकार महामंत्राचे मंगलाचरण केले. त्यानंतर विश्वस्त पराग शहा यांच्या हस्ते मुनिश्री सुप्रभसागर महाराजांचे पादप्रक्षालन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुनिश्रींना शास्त्रभेट देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुनिश्री सुप्रभसागर महाराज म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी जीवनाकडे पाहताना सकारात्मक दृष्टीकोन आत्मसात करून प्रभू रामचंद्रांप्रमाणे आदर्श जीवन जगावे. मानवी जीवनाला योग्य आकार देण्यासाठी प्रत्येक प्रश्न समजून घेण्याबरोबरच स्वतःलाही समजून घेणे आवश्यक आहे. जीवनाचे ध्येय निश्चित करून शिक्षणाच्या माध्यमातून केवळ ‘करिअर’ घडवू नका, तर आपल्या जीवनाची विचारधारा आणि दृष्टिकोन घडवा.”
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, सद्विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि नैतिक मूल्ये आत्मसात करावीत, असा मौलिक संदेशही त्यांनी दिला. तसेच उपस्थित शिक्षकवृंदांना “काळाची गरज ओळखून भावी पिढीबरोबरच उद्याचा सुसंस्कृत समाज घडवा,” असा गुरुमंत्र दिला.मुनिश्री सुप्रभसागर महाराज हे मूळचे सोलापूरचे असून त्यांचे पूर्वाश्रमीचे महाविद्यालयीन शिक्षण याच जैन गुरुकुलात झाले आहे. त्यामुळे या संस्थेचे माजी विद्यार्थी म्हणून मुनिश्रींचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन सहशिक्षक पं. विजयकुमार काळेगोरे व जितेंद्रकुमार डहाळे यांनी केले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















