शैक्षणिक क्षेत्रातील सात वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल.

प्रतिनिधी – सोलापूर
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देणाऱ्या सोलापूरच्या रश्मी परमेश्वर बोराडे यांचे प्रतिष्ठित All India Women Achievers Awards (AIWAA) 2026 साठी ‘Outstanding Educator’ या श्रेणीत नामांकन झाले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असल्याने सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे.
रश्मी बोराडे या गेल्या सात वर्षांपासून अकाउंटन्सी विषयाच्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे अकाउंटन्सीचे विषय सोप्या, सरळ आणि प्रात्यक्षिक पद्धतीने समजावून सांगणे ही त्यांच्या अध्यापनाची खासियत आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले असून, काही विद्यार्थ्यांनी CA Foundation सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवला आहे. तसेच त्यांच्या विद्यार्थ्यांनी HSC परीक्षेत अकाउंटन्सी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.
‘Accounts Made Easy’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये अकाउंटन्सी विषयाची आवड निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांना सक्षम बनवणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या करिअरची भक्कम पायाभरणी करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे AIWAA हे व्यासपीठ यंदा महिला सक्षमीकरणाच्या १० वर्षांच्या प्रवासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येत आहे. या प्रतिष्ठित व्यासपीठावर ‘Outstanding Educator’ श्रेणीत मिळालेले नामांकन हे रश्मी बोराडे यांच्या अध्यापनातील समर्पण, मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेणारे आहे.
या नामांकनामुळे सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रश्मी बोराडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“विद्यार्थ्यांचे यश हेच माझ्या अध्यापनाचे खरे समाधान आणि माझ्या कार्याची खरी पावती आहे,” अशी भावना रश्मी परमेश्वर बोराडे यांनी व्यक्त केली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















