
प्रतिनिधी -अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे आयोजित करण्यात आलेला भव्य दिव्य दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले असून वारकरी परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले वारकरी नृत्य, समाजप्रबोधनपर संदेश, कीर्तन, अभंग आणि भक्तिगीते यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.दिंडी अंत्रोळी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना प्रत्येक घरासमोर ग्रामस्थांनी सडा-रांगोळी काढून दिंडीचे उत्साहात स्वागत केले. अनेक ठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग घेतल्याने संपूर्ण गावात भक्ती, श्रद्धा आणि ऐक्याचे दर्शन घडले.कार्यक्रमादरम्यान श्रीरंग बनसोडे सर यांनी विठ्ठलभक्तीपर गीते सादर करून वातावरण अधिकच भक्तिमय केले. नागनाथ म्हमाणे सर यांनी सादर केलेल्या वारकरी नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. तसेच किर्ती जाधव मॅडम, बनसोडे मॅडम आणि राठोड मॅडम यांनी वारकरी नृत्य व पारंपरिक फुगडीचे आकर्षक सादरीकरण करून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
या दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड सर, श्रीरंग बनसोडे सर, नागनाथ म्हमाणे सर, किर्ती जाधव मॅडम, बनसोडे मॅडम आणि राठोड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, सामाजिक ऐक्य आणि संस्कार यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. उपस्थित ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळीच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा संस्कारक्षम, सांस्कृतिक आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.















