
प्रतिनिधी -सोलापूर,
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक नेतृत्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच, सोलापूर यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘स्व. विजयकुमार हिराचंद शहा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’ श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाळीवेस, सोलापूरचे मुख्याध्यापक राजकुमार काळे यांना प्रदान करण्यात आला.

मा. श्रुतीश्री वडकबाळकर व नभा काकडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी शैक्षणिक नेतृत्व आणि संस्कारक्षम शिक्षणव्यवस्थेच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राजकुमार काळे यांचा गौरव करण्यात आला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक राजकुमार काळे म्हणाले, “हा बहुमान केवळ माझा नसून संपूर्ण गुरुकुल परिवाराचा आहे. संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल.”
यावेळी अरुण धुमाळ, प्रेमचंद मेने, रामचंद्र धर्मसाले, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे तसेच गुरुकुल परिवारातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे श्री दिगंबर जैन गुरुकुलच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याला नवी दाद मिळाली असून, हा सन्मान केवळ मुख्याध्यापक राजकुमार काळे यांचाच नसून संपूर्ण गुरुकुल परिवारासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.















