
प्रतिनिधी -सोलापूर
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त मातंग समाज कृती समिती, शहर जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ‘लोक सम्राट’ या न्यूज पोर्टलचे अनावरण उत्साहात करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सध्याच्या डिजिटल युगात इतर वृत्तवाहिन्या व न्यूज पोर्टलप्रमाणेच ‘लोक सम्राट’ हे न्यूज पोर्टल सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निष्पक्ष व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पोर्टलचे संपादक निलेश डांगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ समाजसुधारक आणि लोकशाहीर नव्हते, तर ते एक प्रभावी पत्रकारही होते. समाजातील वंचित, शोषित आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून व साहित्याच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य केले, असे गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास मातंग समाज कृती समिती, शहर जिल्हा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, शहराध्यक्ष ॲड. शैलेश पोटफोडे, सचिव रमेश बोराडे, कोषाध्यक्ष हिरालाल अडगळे, सहसचिव मसुदेव रणदिवे, कार्यकारिणी सदस्य नितीन साठे, पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे तसेच समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















