
प्रतिनिधी -अक्कलकोट
करजगी, दि. १५ ऑगस्ट २०२६ श्री बसवराज प्रशाला, करजगी ता. अक्कलकोट येथे ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. दयानंद उंबरजे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रतिज्ञा व संविधानाचे वाचनही करण्यात आले.


क्रीडा शिक्षक श्री. नागय्या स्वामी व श्री. संतोषकुमार उंबरजे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन व परेड सादर करून ध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त किशोरकुमार पोतदार सर यांनी मराठी, हिंदी व कन्नड देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.







फेब्रुवारी व मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कै. बसप्पा उंबरजे यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच हणमंत लवटे यांनी कै. शिवाजी लवटे यांच्या स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले.
प्रशालेच्या व्यवसाय शिक्षण विभागातील शिक्षक श्री. महेश कुलकर्णी हे दि. ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सन २०२५-२६ मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने तालुकास्तरावर मिळविलेल्या विजयानिमित्त खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला.

माध्यमिक व उच्च माध्यमिक सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. शिवानंद बिराजदार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. होटकर, करजगी मंडल अधिकारी श्री. सुतार साहेब व कोवाल संघटनेचे अध्यक्ष मा. गुरव साहेब यांनी शाळेला केलेल्या आर्थिक मदतीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. शिवानंद बिराजदार यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष मा. दयानंद उंबरजे यांनी अध्यक्षीय भाषणात, “विद्यार्थी हा शाळेचा कणा असतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे शाळेला आणि गावाला प्रसिद्धी मिळते. विद्यार्थ्यांचा विकास हाच शाळेचा विकास आहे,” असे सांगितले. शाळेला सोलापूर जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळणे तसेच पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या परसबाग उपक्रमात तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामागे संस्था संचालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु. सुष्मिता उंबरजे हिने MPSC प्रथम परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तिचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास गावचे सरपंच तथा संस्थेचे सचिव मा. विवेकानंद उंबरजे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थेचे संचालक, पालकवर्ग, माजी विद्यार्थी तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश पिरगोंडे, श्री. मल्लिकार्जुन येळदरे व श्री. सागर शावळ यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सूर्यकांत उंबरजे यांनी केले, तर आभार श्री. मल्लिकार्जुन येळदरे यांनी मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.















