
प्रतिनिधी -नागपूर
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक राज्याध्यक्ष मा. कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुणभाऊ क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.

दोन्ही पदाधिकाऱ्यांचा प्रदीर्घ कार्यानुभव, संघटनात्मक योगदान तसेच कर्मचारी हितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अरुणभाऊ क्षीरसागर हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत. कर्मचारी प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, कर्मचाऱ्यांना सेवा विषयक मार्गदर्शन करणे तसेच विविध प्रशासकीय प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार, तसेच विविध सामाजिक व संघटनात्मक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सोलापूर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्यपदीही त्यांची निवड झाली आहे.कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करून अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अरुणभाऊ क्षीरसागर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रदीर्घ संघटनात्मक अनुभवाचा उपयोग राज्यातील कर्मचारी संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, गिरीश जाधव यांचीही केंद्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत असून, महासंघाच्या संघटनात्मक कार्याला त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.या बैठकीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, महासचिव सुरेश तांबे, सरचिटणीस प्रभाकर सोनडवले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, सल्लागार राज इंगळे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अरुणभाऊ क्षीरसागर व गिरीश जाधव यांच्या निवडीबद्दल कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शाखाध्यक्ष तसेच कर्मचारी बांधव-भगिनींकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240















