
अक्कलकोट : प्रतिनिधी
“अक्कलकोटची ही पवित्र भूमी श्रद्धा, भक्ती आणि शांततेचे केंद्र आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व्यवस्थापनाने भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा खरोखरच कौतुकास्पद आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने हे देवस्थान भविष्यात आणखी मोठे व्हावे, हीच प्रार्थना आहे,” असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकतीच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी देवस्थानात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. यानंतर श्रीपाद नाईक यांनी देवस्थानाच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी आणि देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वागत केले. दर्शनानंतर देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन तथा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश इंगळे यांनी शाल, श्रीफळ, श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणि कृपावस्त्र देऊन श्रीपाद नाईक यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














