
प्रतिनिधी – सोलापूर
थोर भारतीय मार्क्सवादी विचारवंत तथा माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने दत्त नगर पक्ष कार्यालयात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
यावेळी कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी कॉ. सीताराम येचुरी यांच्या सोलापूरशी असलेल्या घनिष्ठ संबंधांसह कामगार चळवळ, शेतकरी-कष्टकरी जनतेचे प्रश्न आणि राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. येचुरी यांच्या विचारांचा प्रभाव आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यावर राहिला असून, त्यांनी मांडलेली तत्त्वे केवळ भाषणांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष जनआंदोलनांत आणि संघर्षांत आचरणात आणली, असे आडम मास्तरांनी सांगितले.
“मार्क्सवाद हे सर्जनशील विज्ञान आहे; तो कोणताही ठरावीक सूत्र किंवा जडमतवाद नाही. बदलत्या परिस्थितीचे ठोस विश्लेषण करून शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संघर्ष करणे, हाच मार्क्सवादाचा गाभा आहे,” हा विचार यावेळी मांडण्यात आले. कॉ. येचुरी यांनी दिलेला हा वैचारिक दृष्टिकोन स्वीकारून कामगार, कष्टकरी, महिला, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारला. अन्यायाविरोधातील संघर्ष, धर्मनिरपेक्षतेचे रक्षण आणि लोकशाही मूल्यांची जपणूक हीच येचुरींना खरी आदरांजली असल्याचेही आडम मास्तरांनी स्पष्ट केले.
भारतीय राजकारणात धर्मनिरपेक्ष लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांना कॉ. येचुरी यांनी केंद्रस्थानी ठेवले. देशातील विविधता, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही संस्थांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या या भूमिकेचा आदर्श घेत आडम मास्तरांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाला विरोध करत सर्वसामान्य जनतेच्या एकजुटीवर भर दिला. कामगारांच्या हक्कांसाठी, घरकुलासाठी, रोजगारासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी उभारलेल्या चळवळींमध्ये येचुरींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते, असे यावेळी नमूद करण्यात आले.
कॉ. सीताराम येचुरी हे अभ्यासू, संयमी आणि प्रभावी वक्ते होते. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सखोल विश्लेषण करून ते सामान्य जनतेच्या प्रश्नांशी जोडत असत. त्यांच्या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवी संवेदना आणि परिवर्तनाची दिशा होती. त्यामुळे त्यांच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या विचारांचा अभ्यास करून ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे होय, असे आडम मास्तरांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. शैलेंद्र कांबळे, राज्य समिती सदस्य प्रा. बब्रुवाहन पोटभरे, नलिनीताई कलबुर्गी, दत्ता चव्हाण, ॲड. अनिल वासम, माजी नगरसेविका कामिनीताई आडम, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी आदींनी कॉ. येचुरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापुर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240

















