
प्रतिनिधी – अक्कलकोट,
लाखो भाविकांचे व सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थानासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, सामाजिक बांधिलकीतून अन्नछत्र मंडळाने हा संपूर्ण खर्च उचलला आहे.

सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू झाले असून येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती हैद्रा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष रफिक मुजावर यांनी दिली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दर्गा व्यवस्थापनाच्या विनंतीची तत्काळ दखल घेत या सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली. त्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली.
हैद्रा देवस्थान येथे दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याने देवस्थान व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत होता. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वीजखर्चात मोठी बचत होणार असून, देवस्थानच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वीही दुष्काळग्रस्त, गरजू तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी मोलाचे योगदान दिले आहे. हैद्रा देवस्थानासाठी देण्यात आलेल्या या सौरऊर्जा प्रकल्पातून अन्नछत्र मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो, तिच्या शुभारंभासाठी नारळ फोडण्याची परंपरा या देवस्थानातून सुरू होते. तसेच हैद्रा देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून, येथे सर्वधर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात व नवस फेडतात. त्यामुळे या देवस्थानाला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या सौरऊर्जा प्रकल्पासाठी नागनहळळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यांनी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांची भेट घेऊन देवस्थानच्या वाढत्या वीजखर्चाबाबत माहिती दिली होती. त्यांच्या विनंतीची दखल घेत अन्नछत्र मंडळाने संपूर्ण खर्च उचलून देवस्थानला मोठी मदत केली.
या कामासाठी देवस्थानचे उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर आणि सचिव वकील मुजावर यांनीही विशेष परिश्रम घेतले. देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या सौरऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यातील वीजखर्चाचा मोठा भार कमी होणार असून, धार्मिक स्थळांच्या विकासासोबतच सामाजिक सलोखा, सर्वधर्मसमभाव आणि सेवाभावाचा आदर्श या उपक्रमातून समाजासमोर निर्माण झाला आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















