
प्रतिनिधी – सोलापूर
समाजातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या स्वतःच्या घराचा प्रश्न मात्र तब्बल २४ वर्षांपासून प्रलंबित होता. अनेक वर्षांचा संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासकीय अडथळ्यांवर मात केल्यानंतर अखेर पत्रकारांच्या गृहस्वप्नाला यशाची दिशा मिळाली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) सोलापूर उपविभागांतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या योजनेत अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) १२६ आणि अल्प उत्पन्न गटातील (LIG) ११२ सदनिकांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी गृहस्वप्न साकार होण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे.
पत्रकाराचे काम केवळ बातमी लिहिण्यापुरते मर्यादित नसते. दिवस असो वा रात्र, पाऊस असो वा उन्हाळा, एखादी घटना घडली की पत्रकार घटनास्थळी पोहोचतो. नागरिकांच्या समस्या जाणून घेतो, प्रशासनाचे लक्ष वेधतो आणि प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतो. मात्र या धावपळीत अनेक पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या घरासाठीचा प्रश्न मागे ठेवला. मर्यादित उत्पन्न, वाढते घरभाडे आणि कुटुंबाच्या वाढत्या गरजा यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न अनेक पत्रकारांसाठी वर्षानुवर्षे अपूर्णच राहिले.
याच पार्श्वभूमीवर सोलापूरमधील पत्रकार संघटनांनी घराच्या मागणीसाठी सुरू केलेला पाठपुरावा तब्बल दोन तपांपेक्षा अधिक काळ सुरू होता. जागा निश्चित करण्यापासून प्रकल्पाची मंजुरी, भूमिपूजन, बांधकाम आणि अखेर सोडत या प्रत्येक टप्प्यावर पत्रकार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शनिवारची सोडत ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राहता २४ वर्षांच्या संघर्षाचा ऐतिहासिक आणि भावनिक टप्पा ठरली.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी केलेल्या प्रदीर्घ पाठपुराव्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याची आठवण करून देत पत्रकारांना प्रत्यक्ष घर मिळेपर्यंत पुढील पाठपुरावा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोडत प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडून गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घराची चावी देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या आर्थिक परिस्थितीकडेही लक्ष वेधले. पत्रकारांनी राजकीय आणि सामाजिक जीवनात दिलेल्या मार्गदर्शनाचा आपण नेहमी आदर करतो, असे सांगताना ते म्हणाले, “राजकारण्यांचे ग्लॅमर पाच-दहा वर्षांचे असते; मात्र पत्रकारांचे ग्लॅमर कायम असते. अपवाद फक्त आर्थिक परिस्थितीचा.”
पत्रकारांच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर तसेच अन्य माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांनी पत्रकारांच्या कार्यपद्धतीचा विशेष उल्लेख करताना समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या मांडणारा पत्रकार मात्र स्वतःच्या अडचणी अनेकदा सांगत नाही, असे नमूद केले. सोलापुरात पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांच्या आवासाचा विषय प्राधान्याने घेतल्याचे सांगत, लवकरात लवकर पत्रकारांचा आपल्या नव्या घरात गृहप्रवेश व्हावा, अशी मनापासून इच्छा त्यांनी व्यक्त केली.
गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांनी नव्या घरात प्रवेश करून घरात दूध उकळण्याचा मंगल सोहळा साजरा करावा, अशी भावनाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तामिळनाडूमध्ये नव्या घरात प्रवेश करताना दूध उकळण्याची परंपरा असल्याचा संदर्भ देत सोलापुरातील पत्रकारांच्या घरातही लवकरच असा मंगल प्रसंग यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. या प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे त्यांनी सांगितले. या निधीमुळे प्रत्येक सदनिकेच्या किमतीत अंदाजे २ ते २.५ लाख रुपयांपर्यंत घट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोडत कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, म्हाडाचे उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, प्र. कार्यकारी अभियंता मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभागाचे सूरज अजनाळकर आदी उपस्थित होते.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, संपादक प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोडतीच्या कार्यक्रमासाठी म्हाडाचे सोमनाथ रावळे, गोरक्षनाथ कुलट, बालकृष्ण दावनपल्ली, प्रमोद शिंदे, सतीश लष्करे, हरिदास देशमुख, सुमित उभाळे, वर्षा घोरपडे, सुनीता गोडसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शिळीमकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली ही सोडत अनेक पत्रकार कुटुंबांसाठी भावनिक आणि समाधानाचा क्षण ठरली आहे. वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात संसार करणाऱ्या, छोट्या जागेत कुटुंब सांभाळणाऱ्या आणि पत्रकारितेच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीतही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या पत्रकारांना आता स्वतःच्या घराची नवी आशा निर्माण झाली आहे.
समाजाच्या समस्या मांडताना स्वतःच्या घरासाठी संघर्ष करणाऱ्या पत्रकारांच्या २४ वर्षांच्या प्रवासाला या सोडतीने नवी दिशा दिली असून, २३८ पत्रकार कुटुंबांच्या गृहस्वप्नाचा पाया आता प्रत्यक्षात उभा राहिला आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















