
सोलापूर | प्रतिनिधी
भंडारकवठे, खानापूर आणि तेलगाव भीमा परिसरात सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात ऑल इंडिया पँथर सेनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक (भाई) केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष तानाजी (आण्णा) शिवशरण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, संबंधित प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, भंडारकवठे, खानापूर आणि तेलगाव भीमा परिसरातील कथित बेकायदेशीर वाळू उत्खननाची महसूल, खनिकर्म आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यात यावा. तसेच शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान संबंधितांकडून पाचपट दंडासह वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय, बेकायदेशीर वाळू उपशामध्ये सहभागी ठेकेदार, वाहन मालक, वाहतूकदार तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत. उत्खननासाठी वापरण्यात आलेली जेसीबी, पोकलेन, टिपर आणि अन्य यंत्रसामग्री जप्त करावी, तसेच परिसरात कायमस्वरूपी भरारी पथक नेमून नियमित गस्त ठेवावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.या प्रकरणात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, आरटीओ अधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सात दिवसांच्या आत संघटनेला सादर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.आंदोलनात दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सोना कटकदोंड, दक्षिण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत शिकारे यांच्यासह ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन आणि उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला असून, आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
















