
प्रतिनिधी -सोलापूर
स्वामी विवेकानंद कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, जुळे, सोलापूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, विचार आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी काशिद हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या प्रभावी व्याख्यानात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, साहित्यिक योगदान, सामाजिक समतेचा संदेश आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांचे कार्य यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांच्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाला उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त करून त्यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थी सिद्धार्थ जगले याने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची अत्यंत आकर्षक व देखणी चित्रे रेखाटली. त्याच्या उत्कृष्ट चित्रकलेचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत त्याचे अभिनंदन केले.
तसेच विद्यार्थी रितेश बनसोडे याने अण्णाभाऊ साठे यांचे गाजलेले लोकगीत “माझी मैना गावाकडे राहिली” प्रभावी स्वरात सादर केले. त्याच्या सादरीकरणाने सभागृहातील वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे कौतुक केले.
यावेळी म्हमाणे सर यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. प्रतिभा केंगार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रोहिणी पोटफोडे यांनी प्रभावी व नेटक्या शब्दांत केले, तर सौ. मीनाक्षी मेडपल्ली यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्री. शिवाजी काशिद यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेची मूल्ये अंगीकारावीत, असे आवाहन केले. तसेच प्रमुख पाहुणे श्री. किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करून त्यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















