
प्रतिनिधी -सोलापूर
दादर विभागातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मरीआई चौक ते भैय्या चौक (अण्णाभाऊ साठे चौक) या दादर पुलाचे काम तात्काळ सुरू करून गती देण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता महेश येमूल यांनी दिले. दादर विभाग नागरी कृती समितीच्या वतीने १२ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
दादर पूल बंद असल्यामुळे गवळी वस्ती, न्यू लक्ष्मी चाळ, धुम्मा वस्ती, थोबडे वस्ती, थोबडे मळा, देगाव, बसवेश्वर नगर, कोयना नगर, विष्णू मिल चाळ, बल्लार चाळ, हब्बु वस्ती, आमराई, साठे पाटील वस्ती, देशमुख पाटील वस्ती, जानकर नगर, लक्ष्मी पेठ तसेच हिरज, बाळे, कामती, बेलाटी, पाथरी, शिंगोली, तिहे, डोणगाव, नंदूर, तेलगाव, अंत्रोळी व वडापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पूल बंद असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत असून, पेट्रोलचा अतिरिक्त खर्च, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वैद्यकीय आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, अग्निशामक दल तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावर याचा परिणाम होत आहे.
२६ डिसेंबर २०२५ रोजी पूल पाडण्यात आला त्यावेळी डिसेंबर २०२६पर्यंत एका वर्षात पुलाचे काम पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती. त्यामुळे कामाला गती देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी समितीने केली.
मुख्य अभियंता महेश येमूल यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पुलाचे काम तात्काळ करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर प्रस्तावित रेल रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती दादर विभाग नागरी कृती समितीचे निमंत्रक जालिंदर मसलखांब यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ सदस्य गोकुळ भंडारे, अनिल गायकवाड, रितेश कांबळे, नागेश क्षीरसागर, अनिल भुताळे, दीपक आव्हाड, अमर साळवे, ऋषिकेश माळशिखरे, दादा गाडे, सचिन तुळसे, प्रविण गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जालिंदर मसलखांबनिमंत्रक,
दादर विभाग नागरी कृती समितीमरीआई चौक, लक्ष्मी पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथ, दादर विभाग, सोलापूर मो. नं. ७२६४८४२७३७
















