
प्रतिनिधी- सोलापूर
महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले, मारहाण आणि धमकी देण्याचे प्रकार सातत्याने घडत असून, बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पत्रकारांना विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागत आहे. वाळू माफिया, गुटखा माफिया तसेच काही राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे आणि हल्ले करण्याचे प्रकार घडत असल्याने पत्रकारिता करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेची स्थिती चिंताजनक असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील पत्रकार अल्प मानधनावर काम करीत असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्यावर मोठा मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दबाव निर्माण होतो. काही अवैध व्यावसायिकांकडून तसेच संबंधित अधिकारी किंवा पोलीस यंत्रणेला चुकीची माहिती देऊन प्रामाणिक पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे.
खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने संबंधित पत्रकारांची समाजातील प्रतिमा मलिन होत असून, त्यांच्या पत्रकारितेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट यासह अन्य तालुक्यांमध्येही पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचे समितीने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार सुरक्षा समितीचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादरणार आहे. पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे कोणत्या परिस्थितीत दाखल झाले, याची स्वतंत्रपणे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशीत तथ्य नसलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
या शिष्टमंडळात जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी, सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, सचिव रमेश दग्गारी, संघटक गणेश निंबाळकर, रशीद शेख, बसवराज हमाले आणि श्रीनिवास पेद्दी यांचा समावेश असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
















