
प्रतिनिधी : अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अक्कलकोट शहर व तालुका अध्यक्ष बंदेनवाज ईमामसाब कोरबु यांच्या पुढाकारातून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके वाळून गेली असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. त्यातच मागील वर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

तालुक्यातील पाणीटंचाईचा फटका शेतीबरोबरच पशुधनालाही बसत आहे. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेळी-मेंढपाळांसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. पाण्याअभावी शेतीची कामे तसेच ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधींवरही परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, यंदाच्या खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, तसेच मागील वर्षीची प्रलंबित पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना या संकटातून दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदन सादर करताना मल्लिनाथ पाटील, बैलप्पा पुजारी, समाजसेवक संजयकुमार भोसले, इमाम करजगी, शिखर दगडू पटेल, स्वामीराव ढोबळे, चांद बागवान नावदगी, मौलाली मुजावर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














