
प्रतिनिधी – सोलापूर
अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या कारभाराबाबत मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांची भेट घेऊन तक्रार केली. शिक्षकांशी उद्धट वर्तन, मनमानी कारभार आणि शिक्षकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आरबाळे यांच्या कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कट्टीमनी यांनी केली.
या तक्रारीची शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी दखल घेत संबंधित बाबींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे कट्टीमनी यांनी सांगितले. त्यामुळे आता प्रशांत आरबाळे यांच्या कारभाराबाबत प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
आरबाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षकांमध्ये असंतोष असल्याचा दावा कट्टीमनी यांनी केला. त्यांच्या विरोधातील तक्रारींची फाईल मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचेही त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळत असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही कट्टीमनी यांनी उपस्थित केला. आरबाळे यांच्या कार्यकाळात बबलाद येथील शाळेत दुर्घटना घडून विद्यार्थी व शिक्षक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील काही शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात आल्या असून, त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही त्यांनी केली.
कट्टीमनींच्या शैक्षणिक कार्याची शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रशंसा.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्याविरोधातील तक्रार ऐकून घेत असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचीही माहिती जाणून घेतली.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील विद्यार्थिनींना स्वतःचा आणि शिक्षिका पत्नीचा पीएफ काढून विमान प्रवास घडवून आणणे, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राबविणे, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांसह विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे, असे उपक्रम कट्टीमनी यांनी राबविल्याचे सांगितले.
नागणसूर व मैंदर्गी येथील शाळांमध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, बोअरवेलच्या माध्यमातून शाळेच्या परिसरात बाग फुलविणे, विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश तसेच विविध प्रकारची शैक्षणिक मदत उपलब्ध करून देणे, अशा उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
तक्रार करण्यासाठी गेले आणि कौतुकही झाले!
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती ऐकून प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी समाधान व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात अशा समाजोपयोगी उपक्रमांची गरज असल्याचे सांगत त्यांनी कट्टीमनी यांच्या कार्याचे कौतुक केले.
कट्टीमनी यांनी मांडलेल्या तक्रारी तसेच शाळांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न शिक्षणाधिकारी मुळे यांनी सविस्तर ऐकून घेतले. या बाबींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे कट्टीमनी यांनी सांगितले. यापूर्वीही आरबाळे यांच्या कारभाराविरोधात शिक्षकांनी आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240


















