
प्रतिनिधी- उदगीर
देशसेवा हीच ईश्वरसेवा मानत भारतीय सैन्यदल आणि वायुदलात तब्बल ३५ वर्षे प्रामाणिक, निष्कलंक आणि कर्तृत्ववान सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अतनूर (ता. जळकोट) येथील सुपुत्र तथा सैनिक सूर्यकांत वैजनाथराव पंचगल्ले यांचा पंचगल्ले परिवार, जिव्हाळा ग्रुप आणि मित्रपरिवाराच्या वतीने उदगीर येथे बुधवार, दि. १ सप्टेंबर रोजी जल्लोषात आणि संस्मरणीय सोहळ्यात स्वागत करण्यात आले. यावेळी मानपत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सूर्यकांत पंचगल्ले यांनी आपल्या सेवाकाळाच्या सुरुवातीला भारतीय सैन्यदलात तब्बल २२ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. या काळात त्यांनी जम्मू, राजस्थान, पंजाब, लडाख, पुंछ यांसारख्या देशातील अतिसंवेदनशील व आव्हानात्मक भागांमध्ये सुरक्षेच्या विविध विभागांत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर त्यांनी भारतीय वायुदलाच्या डिफेन्स सिक्युरिटी विभागात १३ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली. अखेर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी बिदर येथील तळावरून ते सेवानिवृत्त झाले.


उदगीर येथील स्वगृही परतत असल्याने पंचगल्ले परिवार आणि जिव्हाळा ग्रुपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यांचे आगमन होताच उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले. परिवारातील महिलांनी आकर्षक रांगोळी काढून औक्षण करत त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव केला.
मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाचा प्रेरणादायी प्रवास
या स्वागत सोहळ्यात पशुशल्य चिकित्सक डॉ. अनिल भिकाने यांनी आपल्या मनोगतात सूर्यकांत पंचगल्ले यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. मध्यमवर्गीय कुटुंबातील एका मुलाने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर देशसेवेचा मान मिळवला, ही बाब नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
युवकांना व्यसनमुक्ती व राष्ट्रसेवेचा संदेश
सूर्यकांत पंचगल्ले यांनी आपल्या ३५ वर्षांच्या सेवाकाळातील विविध अनुभव उपस्थितांसमोर मांडले. देशसेवा करताना आलेले आव्हानात्मक प्रसंग, लष्करी शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम यावर त्यांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, प्रदीर्घ सेवाकाळात कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता त्यांनी अत्यंत आदर्श व संयमी जीवन जगल्याचे सांगितले.
यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “देशसेवा करा, शिस्तप्रिय बना आणि व्यसनांपासून दूर राहा. सेवानिवृत्तीनंतर उरलेले आयुष्य गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि एकोपा निर्माण करण्यासाठी समर्पित करेन.”
प्रा. विजया बेलकेरी यांनीही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत देशसेवा करताना येणाऱ्या अडचणी आणि जबाबदाऱ्यांची सांगड कशी घालावी लागते, याबाबत आपले विचार व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या गौरव सोहळ्यास जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, समन्वयक डॉ. अनिल भिकाने, माजी अध्यक्ष देवदासजी नादरगे, माजी अध्यक्ष दशरथ शिंदे, ग्रुपचे सदस्य सचिन बापूरे, हावगी आचारे, सूत्रसंचालक रमाकांत बनशेलकीकर यांच्यासह अशोक हले, बाबुराव वाघमारे, वैजनाथ पंचगल्ले, शिवराज पंचगल्ले, बाबुराव पंचगल्ले, बंधू प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्राध्यापिका विजया बेलकेरी, गुरुवर्य प्रा. महादेव गंदीगुडे, सोमनाथ निरणे तसेच आप्तेष्ट, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार उपस्थित होता.
यावेळी देशभक्तीपर स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. तसेच काही सदस्यांनी ऑनलाइन माध्यमातून सूर्यकांत पंचगल्ले यांना शुभेच्छा दिल्या.
या गौरव सोहळ्यामुळे उपस्थितांच्या मनात राष्ट्रप्रेमाची नवी भावना जागृत झाली. सूर्यकांत पंचगल्ले यांची ३५ वर्षांची देशसेवा, त्याग, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा ही नव्या पिढीसाठी कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-957983824
















