
प्रतिनिधी – अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यात सुमारे १२ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप बिंजगेर-हालहळ्ळीचे माजी सरपंच तथा माजी पोलिस पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते विश्वनाथ इट्टेनवरू यांनी केला आहे. या कथित प्रकरणात प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी व संबंधित यंत्रणेतील व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला असून, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
इट्टेनवरू यांच्या म्हणण्यानुसार, अक्कलकोट तालुक्यातील विविध विकासकामे, शासकीय निधीचा वापर आणि प्रशासकीय प्रक्रियेशी संबंधित बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाल्यास कथित गैरव्यवहाराचे वास्तव समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नसल्याचा आरोप
या प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश बजावूनदेखील अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप विश्वनाथ इट्टेनवरू यांनी केला आहे. न्यायालयीन आदेशानंतरही संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित ती कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष नोंदी, निधीचा वापर, कामांची अंमलबजावणी, संबंधित कंत्राटे तसेच जबाबदार अधिकारी व व्यक्तींची भूमिका यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी
प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा विश्वनाथ इट्टेनवरू यांचा दावा; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
१२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच शासकीय निधीचा गैरवापर झाला असल्यास संबंधित रक्कम शासनाकडे वसूल करण्यात यावी, अशी मागणी इट्टेनवरू यांनी केली आहे.दरम्यान, या आरोपांमुळे अक्कलकोट तालुक्यातील प्रशासकीय कारभार, विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि शासकीय निधीच्या वापराबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या गंभीर आरोपांबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून, प्रशासनाकडून या प्रकरणी काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
या कथित आर्थिक गैरव्यवहाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही, तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्वनाथ इट्टेनवरू यांनी दिला आहे. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून पारदर्शकपणे चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















