
प्रतिनिधी – सोलापूर
जिल्हा परिषदांच्या लेखा संवर्गातील रिक्त पदे भरण्यासह पदोन्नतीचे प्रमाण कमी करण्याच्या नावाखाली पदांची संख्या घटवू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे. आगामी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज, शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) सोलापुरात होणार आहे.
जुळे सोलापूर येथील शिवशंकर मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. या बैठकीत लेखा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.
निवृत्ती तसेच पदोन्नतीमुळे रिक्त झालेली लेखा संवर्गातील पदे तातडीने भरण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच पदोन्नतीचे टक्के कमी करण्याच्या नावाखाली लेखा संवर्गातील पदसंख्या कमी होण्याची शक्यता रोखण्यासाठी कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे पदसंख्या कायम ठेवण्याचा प्रश्न संघटनेच्या आगामी लढ्याचा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
या मागण्यांवर होणार चर्चा
लेखा कर्मचाऱ्यांना १०, २० आणि ३० वर्षांच्या सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा, कनिष्ठ लेखाधिकारी हे पद पूर्णतः पदोन्नतीचे करावे, तसेच लेखा कर्मचाऱ्यांचे जॉब चार्ट निश्चित करावेत, या मागण्यांवरही सभेत चर्चा होणार आहे.
न्यायालयीन प्रकरणांसाठी कृती समिती
उच्च न्यायालयाच्या नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकांचा आढावा घेऊन पुढील पाठपुराव्यासाठी कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय संघटनेच्या घटनेत आवश्यक बदल करण्यासाठी समिती स्थापन करणे आणि २०२५-२६ या वर्षाच्या जमा-खर्चास मान्यता देणे, आदी विषयांवरही सभेत निर्णय घेतले जाणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) राज्याध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून संघटनेच्या विविध मागण्या आणि आगामी भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष आनंद जाधव, कार्याध्यक्ष सूर्यकांत तोडकरी, कोषाध्यक्ष मंगेश शिंदे, माजी अध्यक्ष अनिल बिराजदार, संजय पाटील, उमाकांत राजगुरू, रफिक मुल्ला, प्रकाश शेंडगे आदी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















