
प्रतिनिधी – सोलापूर, दि. ७ सप्टेंबर २०२६
जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांग शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्रोटान शिक्षक संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. प्राथमिक विभागातील वर्षानुवर्षे रखडलेला सेवाज्येष्ठतेचा प्रश्न मार्गी लागल्याने संबंधित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. सुधीर भाऊ कांबळे सर, ज्येष्ठ सल्लागार एस. एम. मोरे सर, महासचिव संतोष कांबळे सर तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राथमिक विभागातील विविध समस्या शिक्षण प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडल्या.

१४ वर्षांपासून रखडलेला सेवाज्येष्ठतेचा प्रश्न मार्गी
श्रीमती अनिता राठोड मॅडम यांचा तब्बल अनेक वर्षांपासून, जवळपास १४ वर्षे रखडलेला सेवाज्येष्ठतेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यासंदर्भातील लेखी आदेशाची प्रत प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे साहेब यांनी प्रोटान शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे सर, ज्येष्ठ सल्लागार एस. एम. मोरे सर आणि महासचिव संतोष कांबळे सर यांच्याकडे सुपूर्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे सर यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवाज्येष्ठतेचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे साहेब यांचे मनस्वी आभार मानले. याप्रसंगी राठोड मॅडम भावनिक झाल्या असून उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.

दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी आमरण उपोषण
प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते.शासन निर्णय दि. १६ जून २०२६ नुसार थकीत वेतन काढण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन साहेब यांनी थकीत वेतनासंदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांच्या फायलींवर सह्या केल्या आहेत.

माहे सप्टेंबर २०२६ च्या वेतनासोबत थकीत वेतनाची रक्कम मिळविण्यासाठी आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संघटनेस सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे आणि प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सचिन जगताप यांनी दिले.

विशेष म्हणजे, संघटनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणातील उपोषणकर्त्यांचे सर्व प्रश्न एकाच दिवसात निकालात काढण्यात आल्याने आंदोलनाला मोठे यश मिळाले.
माध्यमिक शिक्षण विभागावर बेधडक मोर्चा
माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने प्रोटान शिक्षक संघटनेने शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर सचिन जगताप यांच्या कार्यालयावर बेधडक मोर्चा वळविला.
संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही बैठक घेण्यात येत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर बैठक घेण्याचे मान्य केले असून त्यासंदर्भातील लेखी आदेश संघटनेस प्राप्त झाले आहेत.
नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांचा सत्कार
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे नूतन शिक्षणाधिकारी विशाल मुळे साहेब यांचा प्रोटान शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या वतीने प्राथमिक विभागातील विविध प्रश्न मांडण्यात आले. नियमांच्या चौकटीत असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रश्न सोडविताना वैचारिक संघर्ष होऊ शकतो; मात्र या संघर्षातूनच प्रशासन आणि संघटना यांच्यात सकारात्मक मैत्री व समन्वय निर्माण होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यानंतर महिला विभागाच्या प्रतिनिधींसह थोरात मॅडम यांच्या सेवाज्येष्ठतेबाबतचा लिखित निर्णयही प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे साहेब यांनी संघटनेकडे सुपूर्त केला.
या सर्व आंदोलन व पाठपुराव्यात प्रोटान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. सुधीर भाऊ कांबळे सर, जेष्ठ सल्लागार एस.एन. मोरे सर महासचिव संतोष कांबळे सर विभागीय अध्यक्ष अमन कोळी सर, संजयकुमार शिवशरण सर महिला आघाडी प्रमुख अनिता राठोड मॅडम ढाले मॅडम मंडलिक मॅडम तसेच संघटनेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते.सर्व पदाधिकारी, सभासद, बंधू-भगिनी तसेच महिला विभागाच्या सर्व प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संघटनेच्या वतीने आंदोलनात उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, सभासद आणि महिला प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
प्रोटान शिक्षक संघटनेच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व दिव्यांग शिक्षण विभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळाल्याने शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















