प्रतिनिधी – सोलापूर
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये सन्मानपूर्वक लावणे बंधनकारक करण्यात यावे, यासाठी शासन आदेश व राजपत्र काढण्यात यावे, अशी मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ, सोलापूर जिल्हा व शहर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत ऐतिहासिक आणि मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या महान कार्याचा तसेच भारतीय संविधान निर्मितीतील अतुलनीय योगदानाचा सन्मान म्हणून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये त्यांची प्रतिमा सन्मानपूर्वक लावणे आवश्यक आहे.शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने शासन आदेश काढावा व आवश्यक ते राजपत्र प्रसिद्ध करावे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये लावणे बंधनकारक करावे, अशी ठाम मागणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे सोलापूर जिल्हा व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आंबेडकरी चळवळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240















