
प्रतिनिधी- अक्कलकोट
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून-जुलै महिन्यात पेरणी झाल्यानंतर अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पिके करपू लागली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अक्कलकोट तालुक्यातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली तसेच सद्यस्थितीचा आढावा घेतला.
पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दुष्काळसदृश परिस्थितीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक -सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















