प्रतिनिधी – सोलापूर
राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी सोलापूरसह राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचारी १६ आणि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या चारही संघटनांनी आंदोलनाचे टप्पे निश्चित केले असून, मागणी मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मा. उच्च न्यायालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना तत्कालीन राज्य सरकारने स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे सुधारित वेतनश्रेणी लागू केली आहे. मात्र, राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना अद्याप ही वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने समग्र प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे सादर केला होता. उच्च न्यायालयातील दोन विद्यमान न्यायमूर्तींच्या अभ्यास समितीने हा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
याबाबत वारंवार निवेदने देऊन तसेच शासनस्तरावर भेटी घेऊनही सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी लघुलेखक महासंघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी गट-क महासंघ, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ महासंघ आणि महाराष्ट्र राज्य न्यायालयीन चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघ यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी राज्य शासनाला आंदोलन व संपाची नोटीस दिली आहे.
असा असेल आंदोलनाचा पुढील टप्पा
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १६ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शांततेत कामकाज केले. त्यानंतर १६ व १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सामूहिक रजा घेण्यात येईल, तर ६ व ७ नोव्हेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.
तरीही राज्य शासनाने सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबर २०२६ पासून सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा सोलापूर जिल्हा न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. डी. राजेपांढरे यांनी दिला आहे.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पक्षकार आणि विधिज्ञांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच न्यायदानाच्या प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रलंबित प्रस्तावावर लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240