
प्रतिनिधी – सोलापूर
येथील श्री ऐ. प. दि. जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी सिद्धेश्वर बाल मंदिर प्राथमिक शाळेच्या कलाशिक्षिका शिल्पा भैरप्पा यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचून ज्ञानाची क्षितिजे व्यापक करावीत, असे आवाहन केले. त्यांनी सादर केलेल्या कृतीयुक्त मराठी कवितांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी विद्यार्थ्यांना दररोज वर्तमानपत्र वाचण्याची तसेच शाळेच्या ग्रंथालयातील विविध पुस्तके वाचून वाचनाची आवड जोपासण्याची सूचना केली. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना योग्य दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात सहशिक्षक जितेंद्रकुमार डहाळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. राधिका काटकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. विद्यार्थिनी ज्योती खंडागळे, प्राजक्ता भिमपुरे आणि श्रीधर पंडित यांनी मनोगत व्यक्त करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. सहशिक्षक विजयकुमार काळेगोरे यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीतील विद्यार्थिनी हर्षदा हविले हिने सूत्रसंचालन केले, तर मराठी विभागप्रमुख मिलिंद खोबरे यांनी आभार मानले. ‘वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारांतून उज्ज्वल भविष्य’ हा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















