
प्रतिनिधी – सोलापूर
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे, युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आणि नव्या पिढीला राष्ट्रउभारणीसाठी प्रेरित करणे, या उद्देशाने आयोजित पहिले डॉ. अब्दुल कलाम साहित्य संमेलन व राष्ट्रीय चर्चासत्र सोलापुरात उत्साहात संपन्न झाले. १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर येथे झालेल्या या संमेलनाचे आयोजन ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र, पुणे आणि चाणक्य गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कलामांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प
संमेलनाचे मुख्य संयोजक व स्वागताध्यक्ष, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. कलाम यांचे विचार केवळ व्यासपीठापुरते मर्यादित न राहता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत. युवकांमध्ये ज्ञान, विज्ञान, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करून त्यांना राष्ट्रउभारणीसाठी प्रेरित करणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे
संमेलनाध्यक्ष, कवी व प्रेरणादायी वक्ते डॉ. शिवाजी शिंदे यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. संघर्ष, ज्ञान, साधेपणा आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श असलेले कलाम यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे काळाची गरज आहे. युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाचे उद्घाटक, माजी खासदार व भारत विकास संगमचे राष्ट्रीय संयोजक बसवराज पाटील शेडम यांनी युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ज्ञान, विज्ञान आणि कौशल्याच्या बळावर ती साकार करावीत, असे सांगितले. देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातून योगदान द्यावे. राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणे हीच डॉ. कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय चर्चासत्रातून विविध विषयांवर विचारमंथन
संमेलनात डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अशोक नगरकर आणि मुंबईचे जीएसटी उपायुक्त महेबूब कासार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले. राष्ट्रीय चर्चासत्र, प्रेरणादायी व्याख्याने आणि राष्ट्रीय कवी संमेलनाच्या माध्यमातून साहित्य, विज्ञान, सामाजिक जाणीव, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.
उद्योगवर्धिनी, नाशिकचे प्रशिक्षक सुनील चांडक यांनी युवकांना स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन युवकांनी स्वावलंबी व्हावे आणि रोजगारनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘डॉ. कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार २०२६’ने मान्यवरांचा गौरव
शैक्षणिक, सामाजिक, संशोधन, कृषी, महिला व युवा जागृती, ग्रामीण विकास, प्रशासकीय कार्य, क्रीडा, साहित्य आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘डॉ. कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय कवी संमेलनातून साहित्यप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला. ज्ञान, संशोधन आणि कौशल्याच्या माध्यमातून सक्षम भारताची उभारणी करण्यासाठी युवकांना प्रेरित करणे, हा संमेलनाचा प्रमुख हेतू होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले, तर प्रा. बाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले. ड्रीम फाउंडेशनच्या सचिव संगीता पाटील आणि कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
कलामांचे विचार, राष्ट्रउभारणीचा आधार!
भारताच्या विकासाचे स्वप्न पाहणारे आणि युवकांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, ज्ञान, संशोधन, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून सक्षम भारत घडविण्याचा संदेश सोलापुरातील पहिल्या डॉ. अब्दुल कलाम साहित्य संमेलनातून देण्यात आला.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरतीसाठी संपर्क – 9579838240
















