
प्रतिनिधी- कंदलगाव,
ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कंदलगाव येथे शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून आपला संताप व्यक्त केला. ‘आधी ऊसाचे बिल जाहीर करा, त्यानंतरच ऊस घेऊन जा,’ अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. या घटनेमुळे परिसरात ऊसदराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
शेतात दिवसरात्र मेहनत करून ऊस पिकवायचा, त्यासाठी खते, औषधे, मजुरी, पाणी आणि वाहतुकीवर मोठा खर्च करायचा; मात्र ऊस कारखान्याला पाठवण्याची वेळ आल्यानंतर दराबाबत स्पष्टता मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करायचे तरी कसे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच बिघडले आहे. शेतीसाठी घेतलेली कर्जे, खतांचे वाढते दर, मजुरीचा खर्च आणि सिंचनासाठी होणारा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत उसाला नेमका किती दर मिळणार, याची निश्चित माहिती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
ऊस गाळप हंगाम सुरू होत असताना कारखानदारांनी ऊसदराची स्पष्ट घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दर जाहीर न करताच ऊस वाहतूक सुरू होत असल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून आपली भूमिका मांडली. ऊस उत्पादनासाठी मोठा खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ऊसदराची पारदर्शकता राखली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आगामी गाळप हंगामात दराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. आता संबंधित साखर कारखानदार ऊसदर जाहीर करण्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे कंदलगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















