
सोलापूर जिल्ह्यात १,६०० हून अधिक बोगस नावे नोंदवल्याचा आरोप; दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
प्रतिनिधी – सोलापूर
पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात १,६०० हून अधिक बोगस शिक्षकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या कथित बनावट सह्या आणि लेटरपॅडचा गैरवापर करून योग्य पडताळणी न करता शिक्षकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण मतदार यादीची पडताळणी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
पंढरपूर तालुक्यात ३०० बोगस नावे असल्याचा दावा
पंढरपूर तालुक्यात सुमारे ३०० बोगस नावे मतदार यादीत नोंदविण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच राजुरी, कुरकम तुंगर्त, चळे बुद्रुक आदी भागांतही अशा प्रकारच्या नोंदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व नोंदींची शहानिशा करून पात्र शिक्षकांचीच नावे मतदार यादीत राहतील, याची खात्री करण्याची मागणी करण्यात आली.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी एस. कार्तिकीयन यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने केली जाते आणि कथित बोगस नोंदींबाबत कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिका गटनेते अमोल बापू शिंदे, युवानेते ज्ञानेश्वर आप्पा सपाटे, पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले, नागेश पासकंठी, अय्युब पठाण, शशिकांत शिंदे, नागेश माने, आकाश गजघाटे, अनिकेत लोंढे, अमोल कदम, राज शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी होऊन मतदार यादीतील नोंदींची सत्यता स्पष्ट होणे आणि नियमानुसार कारवाई होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
पत्रकार – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















