महेश इंगळे यांना ‘जगद्गुरू बसवलिंग रत्न’ पुरस्कार प्रदान; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
प्रतिनिधी – अक्कलकोट,

अक्कलकोटच्या राजकारणासह धर्मकारण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात महेश मालक इंगळे यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासापासून ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन म्हणून लाखो भाविकांच्या सेवेत त्यांनी घेतलेला पुढाकार हा खऱ्या अर्थाने बसवतत्त्वाला अनुसरून आहे. त्यामुळे सेवा हीच साधना मानणाऱ्या महेश मालक इंगळे यांचा गौरव म्हणजे त्यांच्या सेवावृत्तीचा सन्मान असल्याचे प्रतिपादन नागणसूर येथील श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठाचे पीठाधीश डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी केले.
श्री जगद्गुरू बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ, नागणसूर यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘जगद्गुरू बसवलिंग रत्न’ पुरस्कार डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांच्या शुभहस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात महास्वामीजी बोलत होते.
यावेळी डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी म्हणाले की, महेश मालक इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील स्वच्छता, शिस्त आणि व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. तसेच कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालय, विद्यार्थ्यांचे वसतिगृह, भक्तनिवास, श्री स्वामी समर्थ रुग्णालय, गोशाळा, शिशू विकास मंदिर तसेच स्थानिक श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर आणि मुरलीधर मंदिर यांच्या व्यवस्थापनातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या कार्यातून त्यांनी स्वामीभक्तांचा विश्वास संपादन केला आहे.
पदाचा उपयोग स्वतःच्या मोठेपणासाठी नव्हे, तर जनसेवेसाठी करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून महेश मालक इंगळे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊनच तुप्पीन मठाच्या वतीने त्यांची ‘जगद्गुरू बसवलिंग रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या आगामी सेवाकार्यास अधिक बळ देणारा ठरेल, असे सांगत डॉ. अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.
महेश इंगळे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विविध स्तरांतून तसेच देश-विदेशातील स्वामीभक्तांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, संतोष पराणे, सचिन किरनळ्ळी, श्रीकांत झिपरे, श्रीशैल गवंडी, खाजप्पा झंपले, सुनील पवार, अंकुश केत, डॉ. राजू मलंग, संतोष जमगे, बाळासाहेब एकबोटे, रमेश शिंदे सर, ज्ञानेश्वर भोसले, तुषार मोरे, स्वामीनाथ मुसळे, बसवराज करूटे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागणसूर परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक मठाधिपती तसेच संत-महंत यांचेही दिव्य सान्निध्य लाभले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240

















