
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उपक्रम; यशदासह अधिकाऱ्यांकडून पुस्तकांची भेट
प्रतिनिधी – पंढरपूर
गावातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, तसेच ग्रामस्थांमध्ये वाचनाची आवड वाढावी, या उद्देशाने गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतःचे ‘आपलं वाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. यशदा पुणे येथील उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यशदा पुणे येथील नवनियुक्त अधिकारी (CPTP-12) आणि गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वाचनालयासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्याकडून ५० पुस्तके, तर पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनीही ५० पुस्तके भेट दिली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनीदेखील ५० पुस्तकांचा संच ग्रामपंचायतीला सुपूर्द केला. गावातील अंगणवाडी सेविकांनीही पुस्तके भेट देत या उपक्रमाला हातभार लावला. पुस्तकांचे संच ग्रामविकास पंचायत अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती पंढरपूरचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, यशदाचे विषयतज्ज्ञ कुलकर्णी, समन्वयक कचरे सर, एस. आर. तांबोळी, गोपाळपूरचे प्रशासक सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी क्षितिज पाटील (डीवायएसपी), नितीन आसबे व अमित नंदेश्वर (गटविकास अधिकारी), आशिष गायकवाड व सुमित कानडे (वित्त व लेखाधिकारी), शक्तिसिंह कार्वेकर आणि अनिरुद्ध चव्हाण (सहाय्यक राज्यकर आयुक्त) यांच्यासह शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी पुढाकार
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तके उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनाही वाचनासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून उभारलेले हे वाचनालय गावात ज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक- सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9570838240
















