
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील मरहबा हॉलसमोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी वाहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सायंकाळी नागरिकांनी खड्डेमय रस्त्याची पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
रजा-ए-मुस्तफा मशिदीजवळील या रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा त्रास सहन करावा लागत असून, आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार निवेदने देऊनही समस्या कायम असल्याची तक्रार नागरिकांनी केली.या आंदोलनात पत्रकार मीडिया कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण, शिवसेना अल्पसंख्याक शिंदे गटाचे संपर्कप्रमुख रजाक-मालक मुजावर, परिवर्तन न्यूजचे संपादक अश्फाक शेख, लोक प्रहार न्यूजचे संपादक इरफान मंगलगिरी, रणनीती टाइम्सचे संपादक युनूस अत्तार, पत्रकार अरबाज नाईकवाडी, अफजल शेख यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले.
रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून ड्रेनेजच्या घाण पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास सोलापूर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर सार्वत्रिक मुंडन आंदोलन करण्याचा इशाराही पत्रकार व नागरिकांनी दिला.
आता तरी महापालिका प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नई जिंदगी परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579837240
















