
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आजी-माजी आमदार, त्यांचे पुत्र तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह तब्बल ५४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे आतापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या ६९ वर पोहोचली आहे. दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
गुरुवारी विद्यमान आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह अनेकांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
यामध्ये आमदारपुत्र मनीष देशमुख, रणवीर राऊत, माजी आमदारपुत्र पृथ्वीराज माने, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील, रणजित शिंदे यांच्यासह भारती शिवदारे, कल्याण काळे, सिद्धाराम चाकोते, भीमाशंकर जमादार, कन्हैयालाल देवी आदींचा समावेश आहे.
तालुकानिहाय आणि विविध प्रवर्गांतून उमेदवारी
अक्कलकोट तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि विश्वेश्वर नागूर यांनी अर्ज दाखल केले. बार्शी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी अर्ज दाखल केला. माढा तालुका सोसायटी मतदारसंघातून रणजित शिंदे, मंगळवेढा तालुका सोसायटी मतदारसंघातून बबन आवताडे व सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज भरले.
मोहोळ तालुका सोसायटी मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील आणि त्यांचे पुत्र विक्रांत पाटील यांनी, तर पंढरपूर तालुका सोसायटी मतदारसंघातून कल्याण काळे यांनी अर्ज दाखल केला. सांगोला तालुका सोसायटी मतदारसंघातून पोपट गडदे, उत्तर सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने, तर दक्षिण सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून भारती शिवदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
महिला राखीव मतदारसंघातून अस्मिता गायकवाड, रोहिणी तडवळकर, मंदाकिनी गडदे, सृष्टी टिक्के, निलाबाई काटकर, सविता गायकवाड आणि सिंधू पाटील यांनी अर्ज दाखल केले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सत्यवान कांबळे व शंकर गायकवाड, तर इतर मागासवर्गीय मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अजिंक्यराणा पाटील, नागनाथ कदम आणि जमीर सुतार यांनी अर्ज भरले.भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघातून युवराज राठोड, पोपट गडदे, राहुल घुटुकडे, कृषी पणन मतदारसंघातून रणजित शिंदे व अजिंक्यराणा पाटील, तर दुग्ध संस्था व व्यक्ती मतदारसंघातून रणजित शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
बँका व पतसंस्था मतदारसंघात अनेक दिग्गजांचे अर्ज
बँका व पतसंस्था मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख, मनीष देशमुख, शहाजी पवार, अमोल शिंदे, अस्मिता गायकवाड, रोहिणी तडवळकर, रणजित शिंदे, राजेंद्र गंगदे, कन्हैयालाल देवी, अजिंक्यराणा पाटील, प्रकाश पाटील (पानीव), कल्याण काळे, भीमाशंकर जमादार आणि सिद्धाराम चाकोते यांनी अर्ज दाखल केले आहेत.विशेष म्हणजे रणजित शिंदे यांनी कृषी पणन, सोसायटी, दूध संस्था तसेच नागरी सहकारी बँक व पतसंस्था अशा चार मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विक्रांत पाटील, अस्मिता गायकवाड यांचे शक्तिप्रदर्शन
उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांकडून आपापली ताकद दाखविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहाजी पवार, विक्रांत पाटील आणि अस्मिता गायकवाड यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस
गुरुवारी एकूण १०८ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले असून, आतापर्यंत अर्ज घेणाऱ्यांची संख्या ५१६ झाली आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोण कोणत्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार, तसेच संभाव्य आघाड्या आणि बिनविरोध निवडीसाठी कोणते प्रयत्न होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















