कास्ट्राईब शिक्षक संघटनेची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर (प्रतिनिधी)
सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागातील भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना कायमस्वरूपी जागा व इमारती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती (DPDC) तसेच समग्र शिक्षा अभियानांतर्गत आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संघटनेने दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी जा.क्र. ३०/२०२६ अन्वये दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील तीन जिल्हा परिषद शाळा सध्या भाड्याच्या जागेत सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.यामध्ये जि.प. शाळा शेटे वस्ती येथे ३० विद्यार्थी व २ मंजूर शिक्षक, जि.प. शाळा संगमेश्वरनगर येथे २४ विद्यार्थी व २ मंजूर शिक्षक, तर जि.प. शाळा बागवान नगर येथे २४ विद्यार्थी व २ मंजूर शिक्षक कार्यरत आहेत. या तिन्ही शाळा सध्या भाडेतत्त्वावरील जागेत भरत असून, संबंधित शाळांचे भाडे शिक्षकांना स्वतःच्या खिशातून भरावे लागत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
यापूर्वी या शाळांचे भाडे जिल्हा परिषदेकडून अदा केले जात होते. मात्र, ऑनलाइन पगार प्रणाली सुरू झाल्यानंतर शाळांचे भाडे देणे बंद करण्यात आल्याने शिक्षकांवर आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या खर्चातून भाडे भरावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच त्यांना कायमस्वरूपी आणि सुरक्षित शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या शाळांना DPDC व समग्र शिक्षा अभियानातून निधी मंजूर करून स्वतंत्र जागा आणि शाळांच्या इमारती उभारण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.या मागणीचे निवेदन ई-मेलद्वारे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनाही पाठविण्यात आले आहे. दोन्ही मान्यवर सोलापूर शहरात आल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, जिल्हा सचिव सोमलिंग कोळी, ज्येष्ठ मार्गदर्शक शरद नरगिडे, शहराध्यक्ष पवन कांबळे आदी उपस्थित होते.
भाड्याच्या जागेतील शाळांचा प्रश्न मार्गी लावून विद्यार्थ्यांना हक्काची शाळा आणि शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळणार का, याकडे आता शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -9579838240
















