उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन; महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करून पदाधिकाऱ्यांनी दिले प्रोत्साहन, सीईओ कुशल जैन यांनी केली स्टॉलची पाहणी…

प्रतिनिधी – सोलापूर

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासोबतच त्यांच्या कौशल्याला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषद परिसरात आयोजित ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चा उत्साहात शुभारंभ झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाना कांबळे, सचिन जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे यांच्यासह तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.
उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडून महिला उद्योजिकांना प्रोत्साहन
महोत्सवाच्या उद्घाटनानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी महिला बचत गटांच्या विविध स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वामिनी महिला बचत गटाच्या स्टॉलवरून स्वतः विविध उत्पादनांची खरेदी केली. त्यांच्या या कृतीतून महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश मिळाला. ग्रामीण महिलांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उत्पादनांच्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगकडे लक्ष द्या – सीईओ कुशल जैन
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी महोत्सवातील सर्व महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची पाहणी केली. प्रत्येक बचत गटातील महिलांशी संवाद साधत उत्पादन निर्मिती, गुणवत्ता, विक्री आणि बाजारपेठेतील संधी याबाबत माहिती जाणून घेतली.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याचे नमूद करत त्यांनी उत्पादनांच्या आकर्षक व दर्जेदार पॅकेजिंगवर विशेष भर देण्याच्या सूचना केल्या. उत्पादन कितीही चांगले असले तरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याचे सादरीकरण, पॅकिंग, ब्रँडिंग आणि दर्जा महत्त्वाचा असतो. त्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेसोबतच त्यांचे व्यावसायिक पद्धतीने पॅकेजिंग करण्याकडे लक्ष द्यावे. आगामी महोत्सवात या बाबतीत अधिक सुधारणा कराव्यात, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

महिलांनी उत्पादनासोबत विक्री आणि विपणनावरही भर द्यावा
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ॲड. अमृता वाघे यांनीदेखील बचत गटांच्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. महिलांनी केवळ उत्पादन निर्मितीपुरते मर्यादित न राहता विक्री, विपणन आणि उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन स्थानिक उत्पादनांची खरेदी करावी
रुक्मिणी दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या महोत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांकडून वस्तूंची खरेदी करावी. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ, त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा महोत्सव महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















