तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ऊस बिलांच्या प्रश्नाला अखेर न्याय; ओंकार ग्रुपकडून धनादेशाद्वारे रक्कम वितरणास सुरुवात – ॲड. अमोल पाटील यांची माहिती…

प्रतिनिधी -:सोलापूर
गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा उभारण्यात आला होता. सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील मोर्चा गेट येथे तब्बल १८ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, ओंकार ग्रुपच्या वतीने जवळपास तीन हजार शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे वितरित करण्यात आली आहे. मात्र, या आंदोलनातून मिळालेले यश केवळ २०२५-२६ च्या हंगामापुरते मर्यादित न ठेवता, मागील तीन वर्षांपासून थकीत असलेल्या बिलांचा प्रश्नही मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला होता.


दरम्यान, २०२३, २०२४-२५ आणि २०२५-२६ या हंगामातील ऊस बिलांची रक्कम अद्याप मिळाली नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी ॲड. अमोल पाटील यांच्याकडे केली होती. अनेक शेतकऱ्यांनी तर आपली थकीत रक्कम मिळणार नाही, असे गृहीत धरून आशाच सोडली होती. मात्र, या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, यासाठी ॲड. अमोल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
यासंदर्भात अक्कलकोटचे आमदार सचिन(दादा) कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सुमित शिंदे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्यासह संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा आणि बैठका घेण्यात आल्या. तसेच वेळोवेळी आंदोलनाचे इशारे देऊन थकीत ऊस बिलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर या चर्चेतून आणि पाठपुराव्यातून तोडगा निघाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर हक्काची रक्कम पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विशेष म्हणजे, यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आणि खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत तीन वर्षांपासून थकीत असलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळणे ही त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बाब आहे. ज्यांनी आपले पैसे बुडाले असे समजून आशा सोडली होती, अशा शेतकऱ्यांनाही त्यांची रक्कम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सध्या सुमारे ४० शेतकऱ्यांचा धनादेश वितरणाचा टप्पा पूर्ण झाला असून, एकूण शेतकऱ्यांपैकी साधारण ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच ओंकार ग्रुपच्या वतीने थकीत ऊस बिलांचे धनादेश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. अमोल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, कोणीही गडबड, गोंधळ किंवा घाईगडबड करू नये. सर्व संबंधित शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने धनादेशाद्वारे थकीत बिलांची रक्कम दिली जाणार आहे. याबाबत ओंकार ग्रुपने शब्द दिला असून, उर्वरित शेतकऱ्यांनी शांतता राखून सहकार्य करावे.
या संपूर्ण लढ्यात सहकार्य करणारे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सुमित शिंदे आणि तहसीलदार किरण जमदाडे यांचे ॲड. अमोल पाटील यांनी विशेष आभार मानले. प्रशासनाच्या सहकार्यामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आंदोलनाला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडून आंदोलनाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचविणाऱ्या सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार बांधवांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.
तीन वर्षांपासून थकीत असलेल्या ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांनी दिलेला लढा आणि त्यासाठी झालेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळत आहे. हेच या आंदोलनाचे खरे यश असल्याची भावना ॲड. अमोल पाटील यांनी व्यक्त केली.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















