स्वराज्य माहिती अधिकार संघटनेची जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी.

प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात ई-केवायसी आणि विविध पडताळणी प्रक्रियेमुळे अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील १८ हजार ७९२ रेशनकार्ड कमी झाले असून, तब्बल १ लाख ८ हजार २७४ लाभार्थ्यांची नावे धान्य वितरणाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे शिल्लक राहणारे १ हजार २२९.१७ क्विंटल अतिरिक्त धान्य गरजू केशरी रेशनकार्डधारकांना दरमहा वितरित करावे, अशी मागणी स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सोलापूर जिल्ह्यात ७०३.५९ क्विंटल गहू आणि ५१९.६६ क्विंटल तांदूळ असे एकूण १ हजार २२९.१७ क्विंटल धान्य अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे. हे धान्य गोदामात पडून न राहता त्याचा लाभ जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना मिळावा, अशी संघटनेची भूमिका आहे.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गरजू केसरी रेशनकार्डधारकांना प्राधान्यक्रमानुसार या अतिरिक्त धान्याचे वाटप करण्यात यावे. त्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांचे १२ अंकी डिजिटल रेशनकार्ड तयार करून त्यांना दरमहा धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
ई-केवायसी व पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी धान्य वितरणाच्या यादीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध अतिरिक्त धान्याचा उपयोग गरजू कुटुंबांच्या अन्नसुरक्षेसाठी व्हावा, तसेच पात्र लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकारी : स्वराज्य माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे विश्वस्त उमेश काशिकर, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, जिल्हा सचिव सुधाकर शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, जिल्हा प्रभारी अमर शिंदे, कार्याध्यक्ष दीपक कुरुलकर, जिल्हा सरचिटणीस दत्तगुरू वेदपाठक, अक्कलकोट शहराध्यक्षा मीराबाई बुद्रुक, तालुका सचिव हर्षद पंडित, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर, संतोष पोतदार, मल्लिनाथ जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















