
प्रतिनिधी – सोलापूर
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत न्यायालय परिसराची कसून तपासणी केली.
न्यायालयाचे कामकाज सुरू असताना हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली होती. या ई-मेलमध्ये न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक आढळून आले नाही. त्यामुळे तूर्तास कोणताही धोका आढळलेला नसल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली असून, धमकीच्या ई-मेलचा स्रोत आणि त्यामागील व्यक्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240
















