अंध, दिव्यांग आणि गरजू बांधवांना गोड फराळाचे वाटप; पत्रकारिता जोपासत सामाजिक उपक्रमाची परंपरा – प्रदेशाध्यक्ष – यशवंत पवार.

प्रतिनिधी – सोलापूर
पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यंदाही सामाजिक बांधिलकी जपत वंचितांसोबत दिवाळी साजरी करणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेली अखंडित परंपरा यंदाही कायम ठेवत सोलापूर शहरातील अंध, दिव्यांग, गोरगरीब आणि गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त गोड फराळाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली.
पत्रकार सुरक्षा समिती गेल्या नऊ वर्षांपासून राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. पत्रकारांच्या मागण्यांसाठी आंदोलने, उपोषणे, निवेदने तसेच राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे.
ज्येष्ठ पत्रकारांना समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी आरोग्य व विमा योजना, घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी, यूट्यूब न्यूज चॅनल आणि न्यूज पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती, साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती मिळाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी समिती पाठपुरावा करत आहे. तसेच खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या प्रकरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी, चारचाकी वाहनांना टोलमधून सूट मिळावी आणि ग्रामीण पत्रकारांना पत्रकारितेसोबत पूरक व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठीही समिती प्रयत्न करत आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या आणि मारहाणीच्या घटनांबाबतही समिती सातत्याने आवाज उठवत आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही समितीने हाती घेतले आहे.
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र समाजातील अंध, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेकांना सणाचा आनंद घेणे शक्य होत नाही. हीच जाणीव ठेवून पत्रकार सुरक्षा समिती दरवर्षी या वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करते. त्यांना गोड फराळाचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न केला जातो.
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावनेतून पत्रकार सुरक्षा समितीने गेल्या नऊ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम अखंडितपणे सुरू ठेवला असल्याचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सांगितले.
जनता संघर्ष न्यूज, सोलापूर
संपादक – सिद्धार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क – 9579838240















