प्रतिनिधी -सोलापूर , दि. 11 जुलै 2026 : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था, बाळे (सोलापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी श्री बसवराज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, करजगी या शाळेला प्रतिष्ठेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार पुणे विभागीय माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय सावंत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद उंबरजे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिवानंद बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.
“विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. आधुनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद, आनंददायी शिक्षण, मूल्यशिक्षण, कला, क्रीडा आणि संस्कारक्षम वातावरण यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
याशिवाय इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, नवोदय परीक्षा तयारी, उपचारात्मक अध्यापन, हस्ताक्षर सुधारणा वर्ग आदी उपक्रम नियमितपणे राबविले जातात. या उपक्रमांमुळे शाळेत आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांमधील सातत्यपूर्ण भरघोस यशामुळे प्रशालेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली आहे.
शाळेला हा मानाचा पुरस्कार मिळण्यात संस्थेचे अध्यक्ष ॲड.दयानंद उंबरजे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि योगदान लाभले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या यशाबद्दल संस्थेचे सर्व संचालक, करजगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पालकवर्ग तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले. पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















